Sunday, May 31, 2026
PUNE

कीर्तन सदृश भारतीय कलांमधून रंगभूमीचा उदय-डॉ.प्रविण भोळे यांचे मत

पुणे : कीर्तन पद्धती ही निवेदनपर गायनाची पद्धती आहे. निवेदन आणि गायनाचा आलटून पालटून होणारा प्रवास म्हणजे कीर्तन. रंगभूमीचा इतिहास शिकविताना उगमामध्ये अनुकरण हा घटक दिसून येतो. निवेदन आणि गायनाच्या प्रवासातून रंगभूमीची निर्मीती झाली, याचे संशोधन देखील प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे कीर्तन सदृश्य भारतीय कलांमधून रंगभूमीचा उदय झाला असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) विभागप्रमुख डॉ.प्रविण भोळे यांनी सांगितले. 
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सव २०२० चे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथून आॅनलाईन पद्धतीने करण्यात आले. महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरीदे आदी उपस्थित होते. 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्ध सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे हे संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून सांगणार आहेत. प.पू.जगद््गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशिर्वादाने आणि गुरुवर्य ह.भ.प.डॉ.किसन महाराज साखरे गौरवार्थ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहिरी आणि कीर्तन परंपरा जपणे आणि जोपासणे हा यामागील उद्देश आहे. महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यासोबतच कलांची श्रीमंती सर्वांपर्यंत पोहोचविण्याकरीता आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. 
तीन दिवसीय महोत्सवाच्या समारोपप्रसंगी शनिवार, दिनांक ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी च-होलीकर यांना कीर्तन कोविद ह.भ.प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये ५ हजार, पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी उपस्थित राहणार आहेत. प्रबोधिनीच्या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या फेसबुक पेजवरुन हा महोत्सव रसिकांना विनामूल्य पहायला मिळणार आहे. पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने आॅनलाईन पद्धतीने कीर्तनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading