fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 29: आपल्या देशाला दातृत्वाची आणि सेवेची मोठी परंपरा आहे, हीच परंपरा आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनने 1988 पासून जपून समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे, मारवाडी समाजाने नेहमीच आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा दान करण्याचे, गरजूंची सेवा करण्याचे काम प्रकर्षाने केले असल्याचे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले.

कोविड 19 या विषाणूच्या प्रसारकाळात तसेच लॉकडाऊनदरम्यान गरजूंच्या मदतीसाठी धावून गेलेल्या कोविड योध्द्‌यांचा सत्कार समारंभ आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनतर्फे राजभवन येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सीमेवरील सैनिक असो अथवा गोरगरिबांची मदत करणारा कोविड योद्धा असो, निस्वा:र्थीपणे सेवा आणि दानधर्म करणे ही आपली परंपरा आहे. दान केल्याने, गरजूंची मदत केल्याने जे आत्मिक समाधान मिळते ते कुठेही मिळत नाही. मारवाडी समाजातील कोविड योध्द्‌यांनी लॉकडाऊन काळात जी कामगिरी बजावली ती प्रशंसनीय असल्याचेही राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले. संकटसमयी आपण असेच गरजूंच्या मदतीला धावून जात राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी मारवाडी समाजाला केले.

कोविड योद्धा म्हणून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कोविड योध्द्‌यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये परमार्थ सेवा समितीचे चेअरमन-उद्योगपती लक्ष्मीनारायण बियाणी, महाराष्ट्र पोलीस दलाचे महानिरीक्षक व नावाजलेले गझलकर कैसर खालिद, डॉ. बी.एल.चित्लांगिया, चित्रपट अभिनेते दीपक तिजोरी, धर्मराज फाऊंडेशनचे निलेश चौधरी, ‘जीईओ-रोटी घर’चे चेअरमन मनीष आर. शाह, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय उपसरचिटणीस डॉ. राजेंद्र अग्रवाल, रमेश गोयंका इत्यादींचा समावेश होता. यावेळी आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन अग्रवाल, कवी तथा अभिनेते शैलेश लोढा व फेडरेशनचे इतर सदस्य तसेच कोविड योद्धे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading