fbpx
Thursday, May 2, 2024
ENTERTAINMENTMAHARASHTRATOP NEWS

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख

मुंबई दि. 27 : महाराष्ट्रात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण असणे काळाची गरज बनली आहे. आज मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत असताना या क्षेत्रामुळे अनेक रोजगार निर्माण होत आहेत हे विचारात घेऊनच या क्षेत्रासाठी निश्चित धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.

देशमुख म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मनोरंजन क्षेत्रातून मोठी भर पडत असून यामध्ये आणखी वाढ होण्यास वाव आहे. यासाठीच येणाऱ्या काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातील इतर चित्रीकरण स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महामंडळामार्फत तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये चर्चिले गेलेल्या बाबींचाही मनोरंजन क्षेत्रासाठीचे सर्वंकष धोरण ठरविताना समावेश करण्यात यावा.

महामंडळाने गेल्या 15 वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळातही ही परंपरा अशीच सुरु राहील. येणाऱ्या काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची कामगिरी करेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सन 2019-20 च्या वार्षिक लेख्यांवर चर्चा झाली. सन 2019-20 या वर्षीचा पाच टक्के इतका लाभांश आजच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आला असून लाभांशाची एकूण रक्कम 1 कोटी 41 लाख इतकी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading