fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करावा – बाळासाहेब जानराव

संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट, ‘रिपाइं’तर्फे उद्देशिकेचे सामूहिक वाचन

पुणे : “देशाला एकसंध ठेवत जनतेला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या भारतीय संविधानाचा समावेश प्राथमिक शाळांमधून शिकवणे गरजेचे आहे. संविधान साक्षरतेची शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश व्हावा. त्यातून संविधानाबद्दल अनेकांच्या मनात असणारे अज्ञान दूर होण्यास मदत होईल,” असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केले.

संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजिला होता. ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष संजय सोनावणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, आयुबभाई शेख, नगरसेविका सोनाली लांडगे, हिमाली कांबळे, मोहन जगताप, निलेश आल्हाट, शाम सदाफुले, राहुल कांबळे, विनोद टोपे, किरण भालेराव, संतोष खरात, जितेश दामोदरे, अविनाश कदम, मुकेश काळे आदी उपस्थित होते.

उद्योजक जमशेद करकारिया, पुणे महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, डॉ. कल्पना बळिवंत, ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, राजीव गांधी रुग्णालयातील डॉ. विवेक राजपूत, कॅन्टोनमेंट रुग्णालयातील डॉ. निखिल यादव, डॉ. उदय भुजबळ, मयतांवर अंत्यसंस्कार करणारे अंजुम इनामदार, अरुण जंगम, सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख, परिचारिका अनिता जगताप यांना कोरोना काळातील उल्लेखनीय सेवेबद्दल कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

बाळासाहेब जानराव म्हणाले, “संविधानामुळे भारतीय नागरिकाला सन्मान आणि सुरक्षितपणा मिळाला. त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावेत. डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घ्यावेत. संविधान सन्मान समितीच्या संविधानाबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी माध्यमातून शाळा, महाविद्यालयातून आम्ही जागृती करत आहोत. येत्या काळात संविधान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.”

संजय सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर यांनी आपले विचार मांडले. अंजुम इनामदार यांनी सत्काराला प्रातिनिधिक उत्तर दिले. अशोक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अशोक शिरोळे यांनी केले. आभार शाम सदाफुले यांनी मानले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची फुलांनी सजावट संस्थेच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading