अनअॅकॅडेमी तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी गो-फॉर-गोल्ड उपक्रम
पुणे, दि. २५ – इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इनफॉरमॅटिक्स (आयओआय) २०२१ या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी गो-फॉर-गोल्ड हा उपक्रम सुरू करीत असल्याची घोषणा अनअॅकॅडेमी या भारतातील आघाडीच्या शिक्षण मंचातर्फे करण्यात आली आहे.
आयओआय स्पर्धेसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उपजत बुद्धी विकसीत करण्यासाठी व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोडशेफ तर्फे २०१३ मध्ये गो-फॉर-गोल्ड हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. 2020 मध्ये अनअॅकॅडेमी ने कोडशेफ ताब्यात घेतली. गो-फॉर-गोल्ड उपक्रमाचा भाग म्हणून, अनअॅकॅडेमीतर्फे आयओआय २०२१ या परिक्षेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला १५ लाख रुपयांचे रोख बक्षिस, तसेच एक लॅपटॉप आणि इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कोडचेफ ने अनअॅकॅडेमी च्या प्लॅटफॉर्मवर आयओआय च्या तयारीसाठी एक विनामूल्य शिक्षण कार्यक्रमदेखील सुरू केला आहे. या शिक्षण कार्यक्रमात विषयवार लाइव्ह वर्ग, रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि कोडचेफ स्वयंसेवकांच्या नेतृत्वात शंका-निराकरण सत्रे हे आयोजित करण्यात येते.
आयओआय मध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या चार भारतीय विद्यार्थ्यांची निवड इंडियन कम्प्युटिंग ऑलिम्पियाड’ (आयसीओ) नावाच्या राष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाडद्वारे केली जाते. आयसीओ ही स्पर्धा इंडियन असोसिएशन फॉर रिसर्च इन कंप्यूटिंग सायन्स (आयएआरसीएस), कोडशेफ आणि टीसीएस आयओएन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.
झोनल इनफॉरमॅटिक्स ऑलिम्पियाड(झेडआयओ) ही आयसीओ ची पहिली फेरी १९डिसेंबर २०२०रोजी होईल. या फेरीसाठी कुठल्याही प्रोग्रामिंगची आवश्यकता नाही. यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ७डिसेंबर आहे., इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड इन इनफॉरमॅटिक्स ची स्पर्धा फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार आहे. या मधील २५० विद्यार्थ्यांची आयएनओआय साठी निवड करण्यात येईल. या फेरीसाठी सी प्लस प्लस प्रोग्रामिंग येण्याची आवश्यकता आहे. आयओआय प्रशिक्षण शिबिर मे २०२१ मध्ये चेन्नई येथे होणार असून त्या साठी ३० विद्यार्थ्यांची नावे निवडली जातील आणि इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इनफॉरमॅटिक्स ही शेवटची फेरी सिंगापूरमध्ये घेण्यात येईल. यामध्ये आयओआयटीसी च्या पहिल्या चार विद्यार्थ्यांना यात भाग घेण्याची संधी मिळेल.
अनअॅकॅडेमीमधील कोडशेफ व्यवसाय प्रमुख अनूप काळबालिया म्हणाले की प्रतिष्ठित अशा आयओआयमध्ये यश मिळविण्याकरीता भारतीय विद्यार्थ्यांना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून कोडशेफ चा गो-फॉर-गोल्ड हा उपक्रम अनअॅकॅडेमी ने सुरू ठेवला, याबद्दल आम्ही अत्यंत आनंदित आहोत. शालेय अभ्यासक्रमात समस्यांचे निराकरण व इनफॉरमॅटिक्स हे दोन विषय समाविष्ट करण्यात यावेत, यासाठी जनजागृती करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती देण्याचे आमचे ध्येय आहे आणि याबाबतीत अनअॅकॅडेमी आमच्या बरोबर असणार आहे. कोडे सोडवणे, तर्क लढवणे आणि संगणकीय विचारसरणी बाळगणे यांच्या बळावर प्रत्यक्ष संगणकाचा वापर न करतादेखील प्रोग्रॅमिंग शिकता येते, ही बाब सर्वश्रुत नसली, तरी खरी आहे.
