अभ्यास, करिअर आणि स्वचा शोध यांचा मिलाफ म्हणजे आनंददायी जीवन – अनिल गुंजाळ
पुणे : सध्याचा कोरोनाचा काळ हा व्यक्तिमत्त्व विकासाची संधी शोधण्याचा काळ आहे. जीवनात प्रतिकूल परिस्थितीतही शिकता आले पाहिजे. अभ्यास, करिअर आणि `स्व`चा शोध यांचा मिलाफ म्हणजे आनंददायी जीवन, असे मत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे सहायक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्रमंडळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अभ्यास, करिअर आणि परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, सध्या आपण आपला अधिकतर वेळ घरात घालवत आहोत. मी घरासाठी काय करू शकतो, आई-वडिलांना कसे समजून घेऊ शकतो, घरातल्या माणसांची काळजी कशी घेऊ शकतो, हे आत्मपरीक्षणातून जाणून घेण्याचा काळ आहे. जन्म ते मृत्यू या काळात माणूस शिकत असतो. त्या सहज शिक्षणाकडे डोळसपणे पाहता आले पाहिजे. करिअर हा आयुष्यातील फार मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. स्वतःला आवडणारे क्षेत्र निवडता येणे म्हणजे करिअर होय. कोणत्याही करिअरमध्ये अनेक संधी आहेत.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीच्या शंकाही दूर केल्या. परीक्षेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, परीक्षा होणारच, फक्त तारखा अनिश्चित आहेत. परीक्षेबद्द्लची भीती आणि न्यूनगंड मनातून काढून टाका. जीवन जगणे ही सुद्धा रोजची एक परीक्षाच असते. या परीक्षेला सामोरे जाताना शारीरिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य नीट ठेवा. अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातीयता, व्यसनाधीनता आणि नकारात्मकता यांना दूर ठेवा. चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करा. स्वतःत लपलेला कोहिनूर हिरा शोधा, कारण प्रत्येकात तो दडलेला असतो.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी केले. संयोजन उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित व प्रा. राजेंद्र खजुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुजाता शेणई यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
