दिवाळीनिमित्त ;’आयसीएआय’तर्फे गरजूना जीवनावश्यक वस्तूंची भेट
पुणे : गरिबांच्या दिवाळी सुखाची जावी, या भावनेतून दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, ग्लोबल इंडियन फाउंडेशन व ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या वतीने गरजुंना जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार व सचिव सीए काशिनाथ पाठारे, पुणे ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष आणि ‘विकासा’चे अध्यक्ष सीए समीर लड्डा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ झाला. सामाजिक बांधिलकी अंतर्गत झालेल्या या उपक्रमांवेळी दीपक कोरगावकर, मन्मथ शिवलकर, मोनिका त्रिवेदी, रोहन कासट, संकेत गुजलवार आदींनी मेहनत घेतली. दांडेकर पूल, जनता वसाहत, लक्ष्मीनगर, मीनाताई ठाकरे वसाहत आदी भागातील जवळपास १००० गरीब व गरजू लोकांना या वस्तूंचे वाटप केले.
सीए अभिषेक धामणे म्हणाले, “सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेच्या वतीने नियमित उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांच्या घरातही आनंदात व सुरक्षित दिवाळी साजरी व्हावी, या उद्देशाने ग्लोबल इंडियन फाउंडेशनच्या मदतीने या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये फ्रुट ज्यूस, मिल्कशेक, टूथपेस्ट, सॅनिटायझर, स्वच्छतेचे साहित्य, तेल, साबण आदी गोष्टींचा समावेश होता. कॅल्शियम, व्हिटॅमिन, स्वच्छता आणि प्रतिकारक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने या वस्तू उपयुक्त आहेत. डाबर कंपनीने या उत्पादनांसाठी सहकार्य केले.”
