fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

शरद पवारांचं राज्यपालांना पत्र

मुंबई, दि. 28 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले ‘जनराज्यपाल’ हे पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन ओळींच्या पत्रासह पाठविले होते. हे पुस्तक मिळाल्याचा अभिप्राय कळवताना शरद पवारांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. यात त्यांनी राज्यपालांनी मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून टोलाही लगावला आहे.

पवारांनी पत्रात म्हटलंय, ‘भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, आपल्या एका वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक मला पाठवण्यात आले याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कॉफी टेबल बुकचे अवलोकन केले असता त्यामध्ये आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यासारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या, मान्यवरांच्या गाठीभेटी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम व त्यातील सहभागाची छायाचित्र पाहण्यात आली. तसेच निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद देखील या माहिती पुस्तकात दिसून आली नाही’, अशी आठवण करून देत शरद पवारांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच ‘जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी’ नावाचं एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं आहे. यात स्वतःचा जनराज्यपाल असा उल्लेख केला आहे. या उल्लेखावरदेखील पवारांनी टोला लगावला आहे. आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवल्याबद्दल आभारी, असेदेखील शरद पवारांनी शेवटी पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading