fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNE

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहयोगी शिक्षण अभियानाद्वारे पुन्हा भरले वर्ग

पुणे, दि. २४ – कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ठप्पे झाले आहे. आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांवर भावनिक, मानसिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होऊन शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा शाळा पूर्ववत कधी सुरु होतील, हे निश्चित नाही. पण शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या ‘सहयोगी शिक्षण अभियाना’द्वारे गावातील समाज विद्या केंद्रांत पुन्हा वर्ग भरायला सुरुवात झाली आहे. या आनंदाने मुलांच्या मनातील मळभ दूर होऊन चेहऱ्यावर हास्य फुलले.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली. पण प्राथमिक स्तरावरील ५० टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी तांत्रिक सुविधांचा अभाव असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने युनिसेफच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. यात ग्रामीण भागातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक होते. यामुळे विद्यार्थी गळती, शाळा बाह्य मुलांचे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
या परिस्थितीत मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, विस्कळीत झालेली शैक्षणिक परिस्थिती पूर्ववत करणे यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सहयोगी शिक्षण अभियानाला सुरुवात केली आहे. यात सरपंचांच्या सहकार्याने गावात समाज विद्या केंद्रांची स्थापना केली. तयार केलेल्या विविध कृती, अभ्यासक्रम नियुक्त ‘शिक्षण सारथी’ विद्यार्थ्यांकडून करून घेत आहेत.
१ ऑक्टोबरपासून सहयोगी शिक्षण अभियानाला १६ जिल्ह्यातील २४ तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली. यात ३३ गावांमधील ४५ समाज विद्या केंद्रामध्ये ७१५ विद्यार्थी शासनाचे सर्व नियम पाळून रोज सहभागी होतात. विद्यार्थी-पालकांचा वाढता प्रतिसाद पहाता दुसऱ्या टप्प्यात २०० केंन्द्रे सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. याचा आढवा घेण्यासाठी झूम कॉल मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी मुलांचे पालक, सरपंच, तालुका समन्वयक, शिक्षण सारथी, वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन व्यापक चर्चा केली. ‘हा उपक्रम अतिशय स्त्युत्य असून यामुळे मुलांचे शिक्षण पुन्हा सुरु झाले. मरगळ झटकून सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, अशी एकंदरीत सूचना सर्वांनी केली. हा उपक्रम राबविल्याबद्दल मुलांनी पत्र लिहून आभार मानल्याचे तालुका समन्वयक महेश जाधव यांनी सांगितले. समाज विद्या केंद्र सुरु केल्याने अनेक पालक-विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, हा अनुभव सांगतांना रक्षिता डाकवे यांनी गहिवरून सांगितले.
यावेळी भारतीय जैन संघटना व शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आणि सहयोगी शिक्षण अभियानाचे प्रवर्तक शांतिलाल मुथ्था म्हणाले, ‘विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. या कठीण कोरोनाकाळात हे आपले भविष्य शिक्षणापासून वंचित होऊन भरकटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासारखं दुसरं पुण्याचं काम नाही. म्हणून ही स्मार्ट पिढी घडविण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला. यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत होईल. म्हणून सरपंचांनी आपल्या गावात समाज विद्या केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे. आम्ही सर्व मदतीसाठी सदैव तयार आहोत. यासाठी ९७६२७७७६०० आणि ९७६८०८९०६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading