आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोविड लसीसाठी मिळणार प्राधान्य- डॉ.आशिष भारती

पुणे :  कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्चपासून ते जून पर्यंत एकही सुट्टी न घेता शासकीय व खाजगी रुग्णायलातील आरोग्य सेवा कर्मचा-यांनी काम केले. आज देखील कोरोनाचा धोका संपलेला नसून कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे कोविड लस आल्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक राज्यातील आरोग्य सेवा कर्मचा-यांना कोविड लसीसाठी प्राधान्य मिळणार आहे. पुण्यातील आरोग्यसेवकांची यादी राज्याकडे पाठविली जाणार आहे. हाच ख-या अर्थाने हा त्यांचा कार्याचा गौरव असेल, असे पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ.आशिष भारती यांनी सांगितले. 

सदाशिव पेठेतील नवा विष्णु चौक नवरात्र मंडळ, बाजीराव रस्ता तर्फे जीवनदायी आरोग्य मंदिराचा सन्मान कार्यक्रमांतर्गत एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा गौरव रुग्णालयाच्या आवारात करण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष कुमार रेणुसे, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पीयुष शाह, संदीप लचके, मंडळाचे सचिन जाधव, रवींद्र गांधी, बाळासाहेब पायगुडे, उत्तम वालगुडे आदी उपस्थित होते. 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ.प्रसाद राजहंस, डॉ.माधव भट, सचिन व्यवहारे, शिरीष याडकीकर यांसह डॉ.ज्योत्स्ना भोसले, डॉ.शेफाली लाजेंकर, कांचन कुंभार, कविता झोरे, दुर्गा पवार यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला. 
डॉ.आशिष भारती म्हणाले, कोरोनाच्या या काळात शासकीय व खाजगी रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्यसेवा कर्मचारी मोठे काम करीत आहेत. समाजाने त्यांचा गौरव करायला हवा. डॉक्टरांवरील हल्ले होण्याच्या घटना वाढत असतानाच सार्वजनिक नवरात्रोत्सव व गणेश मंडळांनी रुग्णालयाचा केलेला सन्मान सर्वांसाठी आदर्श उपक्रम आहे. 
रुग्णालयाचे डॉ.माधव भट म्हणाले, डॉक्टरांना धाब्यावर धरणे, त्यांच्याशी वाद घालणे अशा घटना वाढत आहेत. अशा काळात आमच्यासारख्या आरोग्यसेवकांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप पडली आहे. कोरोनाच्या काळात रुग्णाच्या आरोग्यापेक्षा त्याचे मन खचलेले पहायला मिळाले. त्यावेळी डॉक्टरांसह परिचारिका आणि इतर आरोग्यसेवकांनी रुग्णांना मानसिक आधार देत त्यांची साथ दिली, हे आपण विसरता कामा नये. 
कुमार रेणुसे म्हणाले, कोरोनाच्या काळात रुग्णांपासून त्यांचे नातेवाईक देखील दूर गेले. त्यावेळी रुग्णालयातील आरोग्यसेवकांनी त्यांची साथ दिली. त्यामुळे रक्ताचे नाते जरी पातळ झाले असले, तरी देखील आरोग्यसेवकांचे समाजाशी असलेले नाते घट्ट झाले. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि आरोग्य क्षेत्रातील सेवक एकत्र आल्यास समाजाचे आरोग्य सांभाळणे शक्य आहे. त्यामुळे कोरोना काळात उत्तम कामगिरी केलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व तेथील आरोग्यसेवकांचा आम्ही सन्मान केले, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: