कोरोना योद्ध्यांच्या हस्ते सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी सकाळी ९ वाजता घटस्थापनेने झाला. कोरोनायोद्धे असलेल्या स्त्री रोगतज्ञ डॉ.क्षमा उपलेंचवार व नेत्ररोगतज्ञ डॉ.निलेश उपलेंचवार आणि नागपूर येथील प्रा. चारु शंतनु गोयल यांच्या हस्ते पूजन पार पडले. भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वांचे हित घेता यंदाचा उत्सव साधेपणाने करण्यात येत आहे.
मंदिरात मोजक्या विश्वस्तांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापनेचा सोहळा साध्या पद्धतीने झाला. 
यावेळी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अ‍ॅड.प्रताप परदेशी, नगरसेवक प्रविण चोरबोले, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते. दुपारी १२ वाजता आरतीने प्रतिष्ठापना सोहळ्याचा समारोप झाला. देवीसमोर सफरचंदाच्या फळांचा भोग लावण्यात आला होता. 
प्रशासनाच्या सर्व सूचनांनुसार खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात सुरक्षितेच्या दृष्टीने सी.सी. टी.व्ही.ची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मंदिरामध्ये ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार असून विविध सामाजिक उपक्रमांवर देखील भर देण्यात येणार आहे. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता व श्री महाकाली माता यांच्या चरणी कोरोना महामारीचे  संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, नवरात्र महोत्सवामध्ये सकाळी ६ ते ७ व सकाळी ८ ते ९ या वेळेत भाविकांना आॅनलाईन संकल्प करुन अभिषेक करता येईल. मंदिरात दररोज श्री महालक्ष्मी महायाग ( हवन ) सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ४ ते ८ व अष्टमी दिवशी श्रीदुर्गासप्तशती महायाग करण्यात येईल.  तसेच रोज सकाळी ७:१५ वाजता व संध्याकाळी ७:१५ वाजता महाआरती होईल. वरील सर्व पूजा या आॅनलाईन पध्दतीने केल्या जातील. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन नाव नोंदणी करता येईल. मंदिराची वेबसाईट, फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री महालक्ष्मी देवीला दररोज २००० ते २५०० फळांचा नैवेद्य ; कोविड सेंटर्सना प्रसाद पाठविणार
श्री महालक्ष्मी मातेसमोर नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज सुमारे २००० ते २५०० फळांचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. दररोज वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविण्यात येणार असून हा फळांचा प्रसाद पुण्यातील विविध कोविड सेंटर्सना पाठविण्यात येणार आहे. कोविड सेंटर्समधील रुग्ण, कर्मचारी व डॉक्टरांकरीता हा प्रसाद असणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून संपूर्ण उत्सवात सुमारे २० हजार फळे कोविड सेंटर्समधील रुग्ण व कर्मचा-यांना देण्यात येतील, असे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: