पर्वती, पद्मावती विभागात वीजपुरवठा सुरळीत; पर्यायी व्यवस्थेतून चक्राकार भारनियमन टाळले

पुणे, दि. 10 – महापारेषणच्या नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आल्यानंतर महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागात आज दुपारी 1.13 वाजेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दुपारनंतर चक्राकार भारनियमन टाळण्याची कामगिरी केली.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या 400 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला होता. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. 4 या 220 केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला होता. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील 82 वीजवाहिन्यांवर आज (दि. 10) सकाळी 8.35 वाजेपासून चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन सुरु करण्यात आले होते. परंतु, महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी तसेच चक्राकार भारनियमन टाळून पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले. यामध्ये तांत्रिक उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1.13 वाजता नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: