समाजाभिमुख संशोधने व्यवसायात रूपांतरित व्हावेत – डॉ. नितीन करमळकर

पुणे : “उद्योग आणि शिक्षणसंस्थांमधील दरीविषयी नेहमी बोलले जाते. पण अलीकडच्या काळात ही दरी दूर करण्यासाठी औद्योगिक संस्था आणि शिक्षणसंस्था एकत्रित येत आहेत. उद्योगांना आवश्यक आणि समाजाभिमुख संशोधनावर शिक्षण संस्थांनी भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच अशा संशोधनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असून, त्यासाठी एकमेकांतील सामंजस्य करार उपयुक्त ठरतील,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसीपीपीयू) रिसर्च पार्क फाउंडेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन (टीटीए) यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारत आहुजा, रिसर्च पार्क फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक विश्वास काळे, अनिल चैतन्य आदी उपस्थित होते.

डॉ. नितीन करमळकर पुढे म्हणाले, ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधनांना बाजारपेठेत व्यावसायिक रूपात आणण्याच्या दृष्टीने रिसर्च पार्क फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. या फाउंडेशनबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनचा करार होणे ही चांगली बाब आहे. उद्योग क्षेत्रात अनेक वर्षे काम केलेली मंडळी या असोसिएशनमध्ये असल्याने विद्यापीठातील संशोधकांना उद्योजकता विकास साधण्यासाठी त्यांचा अनुभव कामी येईल. तसेच या संशोधकांचे तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांना स्टार्टअप सुरु करण्यात, व्यवसाय उभारण्यात मदत होईल. त्यातून अनेक नवतंत्रज्ञान विकसित होतील. हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ करून देता येईल.”

यशवंत घारपुरे म्हणाले, “शिक्षणसंस्थांतील संशोधनांना कंपन्यांशी जोडून देण्याचा आमचा उपक्रम आधीपासूनच सुरु झाला आहे. मॉडर्न कॉलेजबरोबर इलेक्ट्रिकल व्हेइकलवर संशोधन करून तीनचाकी वाहने निर्मितीचे काम सुरु आहे. पीएचडी करत असलेल्या तरुण लोकांच्या ज्ञानाचा उपयोग उद्योगांना करून घेऊन त्यातून व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न कसा करता येईल, यासाठी आमची संस्था काम करत आहे.”

डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, “या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उद्योगांशी संवाद करता येणार आहे. उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ पदावरील आणि अनुभवी लोकांचा समावेश ‘टीटीए’मध्ये असल्याने त्याचा लाभ होईल. येथील संशोधन व्यवसायाच्या रूपात समाजापर्यंत पोहोचताना आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल.” विलास रबडे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: