अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल

सातारा – वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे या दोघांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

गुरुवारी पुण्यात मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजेंवर टीका केली होती. ‘एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन. दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. तसेच तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना माहिती नाही, आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तर गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दखल करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: