कोरोनाच्या मानसिक तणाव मुक्तीसाठी ‘मनसंवाद’ ची साथ
पुणे, दि. २३ – कोरोनाच्या भितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणारा मानसिक ताणतणाव दूर करण्याकरीता व मानसिक समस्यांवरील उपाय तज्ज्ञांकडून जाणून घेण्याकरीता मनसंवाद हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्यातर्फे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ही हेल्पलाईन चालविण्यात येत आहे.

सामान्यांच्या हाकेला आमची साद, असे सांगत कोरोनामुळे ताणतणाव निर्माण झाला असेल, तर आम्हाला संपर्क करा, असे आवाहन या हेल्पलाईनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जात आहे.
कोरोनाच्या लढाईमध्ये नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी सुरु करण्यात आलेली ही हेल्पलाईन २४ तास सुरु आहे. याकरीता मानसिक सहाय्यता कक्ष ०२०-२६१२७३३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामाध्यमातून तज्ज्ञांकडून नागरिकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
