पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द
जगभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आतंराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहिती नुसार ६४ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा रद्द केल्याचे म्हटले जाते.

नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने या संदर्भातील माहिती दिली.नोबेल पुरस्कार सोहळे वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचे ही यावेळी स्पष्ट केले.
“ज्या प्रकारे नोबेल आठवडा आयोजित करण्यात येतो तसा यावेळी होणार नाही. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावेळची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष निराळे आहे. सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. त्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल,” अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.
दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नोबेल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होते. यालाच नोबेल विक म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी या कालावधीत त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केले जाते. स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात विजेत्यांसाठी स्वीडिश राजघराण्यातील आणि जवळपास १३०० पाहुण्यांसोबत भोजनाचे देखील आयोजन केले जाते. शांती पुरस्कार विजेत्यांना ओस्लोमध्ये सन्मानित केले जाते. त्यांना देखील याठिकाणी येण्याचे आमंत्रण दिले जाते.
