पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह
पुणे, दि. 23 – महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुखांसह 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील एकाच मजल्यावर बसणारे 12 कर्मचार्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व कर्मचार्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
पालिकेच्या विविध विभागातील तब्बल 250 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. यामध्ये स्वच्छता कर्मचार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालिकेच्या आठपेक्षा अधिक नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चाललेला असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी बसतात. यासोबतच विविध कोविड केअर सेंटर्ससह विलगिकरण कक्षात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी कामानिमित्त पालिकेत येत असतात. यासोबतच नागरिकही आपली कामे घेऊन मुख्य इमारतीमध्ये येत आहेत.
आरोग्य विभागाच्या शहरी गरीब रोजनेसह विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिक येत असतात. या विभागातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने बुधवारी आरोग्य विभागातील 100 कर्मचार्यांची रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 12 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या सर्वांना उपचारांसाठी तातडीने पाठविण्यात आले असून काही जणांना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. पालिका इमारतीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची तपासणी केली जाणार आहे.
जेणेकरून पॉझिटिव्ह असलेल्यांकडून अन्य कोणाला लागण होऊ नये. यासोबतच महापालिकेच्या अतिरकीत आयुक्त कार्यालयातील दोन शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत.
