Monday, August 31, 2026
MAHARASHTRA

राजगृहावर तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

मुंबई, दि. २२ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (वय २०) असे या आरोपीचे नाव आहे. विशाल हा कल्याणला राहणारा असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजगृह या निवासस्थानी केलेल्या तोडफोड प्रकरणी माटुंगा पोलिसांनी उमेश सीताराम जाधव (वय ३५) या आरोपीला अटक केली होती. तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हिंदू कॉलनीमधील राजगृहातील फुलझाडांची, कुंड्यांची दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती. शिवाय दगडफेक करत राजगृहाच्या काचा फोडल्या. यासह सीसीटीव्ही कॅमेरे फोडून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर राजगृहाजवळ कडक २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading