जागतिक युवा कौशल्य दिनी पाचशे जोरांचे प्रात्यक्षिक
पुणे, दि. १५ – जागतिक युवा कौशल्य दिनाचे ( १५ जुलै )औचित्य साधून फेस बुक लाईव्ह च्या माध्यमातून ५०० जोरांचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा उपक्रम पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेतील शिक्षक प्रांजल अक्कलकोटकर यांनी केला. सलग दुसऱ्या दिवशी १६ जुलै रोजीही हा उपक्रम सुरू राहणार आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉक डाऊन च्या कालावधीत जिम आणि अन्य क्रीडा केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.परंतु पारंपरिक भारतीय व्यायाम हा घरच्या घरी देखील करता येतो.
या भारतीय व्यायाम परंपरेतून प्रेरणा घेऊन युवकांनी घरच्या घरी लॉक डाऊन मध्ये देखील बलोपासना चालू ठेवावी या उद्देशाने प्रांजल अक्कलकोटकर यांनी दि.१५जुलै रोजी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ५०० जोरांचे प्रात्यक्षिक दिले.
सायंकाळी ६ ते ७ या वेळात हे प्रात्यक्षिक त्यांच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंट वरून दिले गेले. १६ जुलै रोजी ही हा उपक्रम चालू राहणार आहे.
भारतीय परंपरेतील दंड बैठका,सूर्यनमस्कार या सारखे व्यायाम प्रकार तरुणांनी जोपासावे हा या प्रात्यक्षिकामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉक डाऊन च्या कालावधीत मनोबल आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी अशा व्यायाम प्रकरांचा नक्की उपयोग होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
