पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाउन
पुणे, दि. 10 – पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला. लवकरच याबाबतची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा लॉकडाऊन सोमवारपासून करायचा की मंगळवारपासून याचा निर्णय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांना काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असल्याचं आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी लॉकडाऊन कधी लागू करायचा याचा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सोमवारी (13 जुलै) लागू करायचा की मंगळवारी (14 जुलै) या निर्णय मनपा आयुक्त घेणार आहेत.
