राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मातोश्री
मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राजकीय हालचालींनाही वेग आलेला आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. पण राजभवनातील हालचाली पाहता पडद्यामागून बरचं काही घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मातोश्री गाठली, याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात तब्बल दीड-दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यात सुरु असणाऱ्या घडामोडी पाहता ठाकरे-पवार भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. कोरोना संकट हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाकडून वारंवार केला जात आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळातही शरद पवारांनी बैठकीसाठी मातोश्रीवर जाणं टाळलं होतं. पण सोमवारी अचानक घडणाऱ्या या घडामोडींमुळे राज्यात नेमके चाललंय काय? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. राज्यात वाढणारे कोरोना रुग्ण आणि परिस्थिती हातळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरत असल्याचं चित्र भाजपाकडून पसरवलं जात असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा यासाठी केंद्राने काही हालचाली सुरु केल्या आहेत का? या विषयावरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शरद पवार राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा सुरु असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवित असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावला आहे