Sunday, June 21, 2026
MAHARASHTRAPUNE

पुण्यातील नागरी सहकारी बँकांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता १ कोटी ५७ लाख ३२ हजार रुपयांची मदत

पुणे : महाराष्ट्रामध्ये सहकाराचे मूळ चांगलेच रुजले आहे. महाराष्ट्राची जडणघडण व प्रगतीमध्ये सहकारी संस्थांचे खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील अनेक अडचणींच्या प्रसंगी सहकारी बँकांनी आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याने तो प्रादुर्भाव रोखण्याकरीता पुण्यातील नागरी सहकारी बँकांनी पुढे येत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता १ कोटी ५७ लाख ३२ हजार २२२ रुपये इतकी रक्कम मदत म्हणून दिली आहे. 
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन या सहकारी बँकांच्या शिखर संस्थेच्या पुढाकाराने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे अनिल कवडे यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, संचालक सुनील रुकारी, निलेश ढमढेरे, जनार्दन रणदिवे, विजयराव ढेरे, दिलीप शिंदे, चंद्रकांत कवडे आदी उपस्थित होते. 
अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता योगदान देऊन आम्ही थांबलो नाही. तर, विविध सहकारी बँकांच्या माध्यमातून ससून रुग्णालयाला पीपीई किट, आंबेगाव, सासवड, इंदापूरसह पुणे मनपातील ४ हजार ५०० कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पोलिसांसाठी ४० ठिकाणी तंबूंची सोय, जनकल्याण समितीतर्फे सुरु असलेल्या कामासाठी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता २७ नागरी सहकारी बँकांनी आणि प्रत्यक्ष वस्तुरुपी मदत देण्याकरीता ७ बँकांनी सहभाग घेतला आहे. भविष्यात देखील गरजूंना व शासनाला जी मदत लागेल, ती असोसिशनच्या माध्यमातून आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन या सहकारी बँकांच्या शिखर संस्थेच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता १ कोटी ५७ लाख ३२ हजार २२२ रुपये निधी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे अनिल कवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी (डावीकडून) जनार्दन रणदिवे,सुनिल रुकारी, विजयराव ढेरे, अ‍ॅड.सुभाष मोहिते, अनिल कवडे, निलेश ढमढेरे, अ‍ॅड.साहेबराव टकले, दिलीप शिंदे, चंद्रकांत कवडे आदी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading