पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह मध्ये दाखल
नवी दिल्ली, दि. 3 – भारत – चीनच्या सीमेवरील तणावाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेह गाठले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी येथे दाखल झाले आणि त्यांनी जवानांची भेट घेतली. यापूर्वी या दौर्यासाठी फक्त चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत हे येणार होते. मेपासून चीनच्या सीमेवर तणाव आहे आणि सीमेवरील गंभीर परिस्थिती कायम आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौऱ्याबद्दल प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींच्या या दौऱ्याने भारत आपली भूमी वाचवण्यासाठी सदैव तयार असल्याचा इशारा चीनला मिळाला आहे.

याआधी शुक्रवारी केवळ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे लेह येथे भेट देतील असे ठरले होते, परंतु गुरुवारी त्यांचा कार्यक्रम बदलण्यात आला. मग केवळ बिपीन रावत हे लेहला जातील असा निर्णय घेण्यात आला. मात्र यानंतर पंतप्रधान मोदी हे देखील लेहला पोहोचल्याची माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी सोशल डिस्टन्सचे सर्व नियम कटाक्षाने पाळण्यात आले.
