Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

समर्थ पॅनलच्या चित्रपट कलाकार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ‘समर्थ पॅनल’तर्फे आयोजित करण्यात आलेला चित्रपट कलाकार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या या मेळाव्यास मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कामगार तसेच महामंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात समर्थ पॅनलचे प्रमुख निर्माते मेघराज राजेभोसले यांनी उपस्थितांशी संवाद साधत महामंडळाच्या विकासासाठीची आपली भूमिका आणि भावी कार्यआराखडा मांडला. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध प्रश्न, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या समस्या, तसेच महामंडळ अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी समर्थ पॅनल कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, निर्माता सुनील महाजन, लेखक राज काझी, दिग्दर्शक अजित शिरोळे, दिग्दर्शक दीपक कदम, अभिनेते सुशांत शेलार, निर्माते भाऊसाहेब भोईर, अभिनेते सुनील गोडबोले, ‘भूमाता’च्या तृप्ती देसाई,कला दिग्दर्शक संतोष संखद,
मंदार जोशी, किरण साळी,विनोद सातव, सुरेश धोत्रे, समीर हंपी, डॉ अजितसिंह पाटील, शरद गोरे, समद पठाण,अमर गवळी,मंगेश मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.

मेळाव्यात कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन समर्थ पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच महामंडळाच्या माध्यमातून नवोदितांना संधी, कलावंतांचा सन्मान आणि उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

“कलाकारांचा सन्मान – मराठी चित्रसृष्टीचा विकास” हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणूक लढवत असलेल्या समर्थ पॅनलला मेळाव्यात उपस्थित सदस्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपस्थितांच्या मोठ्या प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत समर्थ पॅनलची ताकद अधोरेखित झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मेळाव्याच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आणि महामंडळाला सक्षम नेतृत्व देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading