ग्रहण न पाळणाऱ्या गर्भवती महिलेचा अंनिस च्या वतीने सन्मान
पुणे : नांदेड सिटी येथील एक गर्भवती महिला चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी गरोदर असतानाही परवा झालेल्या चंद्रग्रहणाच्या वेळेत भाजी चिरली व इतरही कामे केली. ग्रहण न पाळण्याचे त्यांच्या या धारिष्ट्याचे कौतुक अंधश्रद्धा निर्मूलन समिती,पुणे शहर शाखेतर्फे, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथ भेट देऊन करण्यात आले.
ग्रहण न पाळण्याचे आपले अनुभव सांगताना चांदणी थोरात म्हणाल्या की, “माझे मोठे दिर आणि अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या प्रेरणेमुळे आणि आमच्या कुटुंबांच्या पाठिंब्यामुळेच मी हे चंद्रग्रहण न पाळण्याचे धाडस करू शकले. प्रसार माध्यमांनी या माझ्या छोट्या कृतीला प्रचंड प्रसिद्धी दिली. लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला. त्यामुळे माझे नातेवाईक मित्रमंडळी यांचे मला खूप फोन आणि मेसेज आले. त्यांनी या माझ्या कृतीचे कौतुक केले. काही विघ्नसंतोषी लोकांनी सोशल मीडियावर मला प्रचंड ट्रॉलिंग केले, त्यांचं मला वाईट वाटले. पण आमचे कुटुंब पुरोगामी विचारांचे असल्याने मी ते ट्रोलिंग मनावर घेतले नाही”.
यावेळी अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख म्हणाले की, ग्रहण अशुभ नसते. त्यावेळी कोणतेही घातक किरण बाहेर पडत नाहीत. गरोदर महिलांनी ग्रहण न पाळण्याचे धाडस केले पाहिजे. ते धाडस चांदणी थोरात यांनी केल्यामुळे इतर गरोदर महिलांना त्यातून प्रेरणा मिळेल.
चांदणी प्रफुल्ल थोरात यांच्या या कृतिशील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कामाबद्दल त्यांचे आणि थोरात कुटुंबीयाचे मनःपूर्वक अभिनंदन करणेसाठी अंनिस पुणे शहर शाखेच्या अध्यक्षा अनुराधा काळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान ग्रंथ देऊन करण्यात आला. यावेळी अंनिस चे कार्यकर्ते मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, श्रीराम नलवडे, बाळकृष्ण लोंढे, वसंत कदम, प्रफुल्ल थोरात उपस्थित होते.
