Friday, April 3, 2026
Latest NewsSports

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन !!


पाच राज्यांतील ५१ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार !!

पुणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेत पाच राज्यांतील सुमारे ५१ विद्यापीठ संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा पुण्यातील विविध हॉकी मैदानावर दि. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेल्या ७६ वर्षांच्या इतिहासामध्ये मुलींच्या पश्चिम विभागीय हॉकी स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच होत आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहीती देताना खडकी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सोसायटीचे सचिव आनंद छाजेड, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय प्रा. संजय चाकणे आणि पुणे विद्यापीठ क्रिडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी सांगितले की, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांतील ५१ विद्यापीठांतील संघ सहभागी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय यांनी या स्पर्धेची यजमानपदाची जबाबदारी घेतली आहे. या स्पर्धेतील पहिले चार संघ अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. जोश सॉफ्टवेअर, एसएनबीपी स्कूल सहकार्य आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी स्पर्धेला सहकार्य केले आहे. हॉकी महाराष्ट्र संघटनेकडून तांत्रिक नियोजन तसेच मॉडर्न फिजीओथेरपी महाविद्यालय आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ब्रीजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजीओथेरपी यांच्याकडून स्पर्धेसाठी वैद्यकिय मदत घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे सामने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी मैदान, चिखली येथील एसएनबीपी महाविद्यालय मैदान आणि खडकी येथील रेल्वे पोलिस मैदानावर स्पर्धेचे सामने रंगणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेते ठरणाऱ्या संघांना करंडक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, स्ट्रायकर, मध्यरक्षक आणि बचावपटू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत, असे स्पर्धेचे समन्वयक टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ. महेश बेंडभर यांनी सांगितले. या स्पर्धेच्या संयोजन आणि नियोजन टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, त्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि खडकी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. सुरेश गोसावी तसेच एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या संचालक वैशाली भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठ, आरटीएम नागपुर विद्यापीठ, आहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापुर, कोल्हापुर शिवाजी विद्यापीठ, केबीसीनॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत.

गतवर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये जयपूरच्या सुरेश ज्ञानविहार विद्यापीठात झालेल्या या स्पर्धेत आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर संघाने विजेतेपद तर, सुरेश ज्ञानविहार विद्यापीठ यांनी उपविजेतेपद मिळवले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा आणि रविंद्रनाथ टागोर विद्यापीठ-भोपाळ यांनी चौथा क्रमांक मिळवला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading