युवा कलाकारांच्या ‘सवाई’ तील पदार्पणाला रसिकांची भरभरून दाद
ह्रषीकेश बडवे आणि इंद्रायुध मजुमदार यांनी गाजवला सवाईच्या दुसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध
पुणे : सवाईच्या स्वरमंचावर प्रथमच सादरीकरण केलेल्या गायक ह्रषीकेश बडवे आणि सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांच्या कलाविष्काराला गुरुवारी रसिकांची भरभरून दाद मिळाली. या युवा कलाकारांच्या प्रगल्भ सादरीकरणातून अभिजात भारतीय संगीताविषयीचे एक आश्वासनही रसिकांना मिळाले.
आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे. गुरुवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात युवा गायक ह्रषीकेश बडवे यांच्या गायनाने झाली. ह्रषीकेश बडवे यांनी तयारीच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. सवाईच्या स्वरमंचावर त्यांनी प्रथमच सेवा रुजू केली. त्यांनी राग गावतीमध्ये विलंबित झुमरा तालात ‘खबर सब की…’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुत त्रितालातील ‘शान ए ताजमहल…’ ही बंदिश त्यांनी रंगवली. त्यानंतर श्रीकल्याण रागात रूपक तालातील ‘साहिब तुम करम करो…’ आणि मध्यलय त्रितालातील ‘सावरिया अब तो हम तुम संग…’ या दोन बंदिशी प्रस्तुत केल्या. ह्रषीकेश यांनी सादर केलेल्या सर्व बंदिशी त्यांचे गुरू पं. विजय बक्षी यांच्या होत्या. रसिकांच्या आग्रहाखातर ह्रषीकेश यांनी ‘घेई छंद मकरंद…’ हे गाजलेले नाट्यपद अतिशय दमदारपणे पेश केले. उत्तम दमसास, तानांमधील फिरत आणि सादरीकरणातील आत्मविश्वास उल्लेखनीय होता. त्यांना प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम) तसेच प्राजक्ता बडवे आणि वत्सल कपाळे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
पं. भीमसेन जोशी यांची आठवण जागवताना ते म्हणाले, “२००० साली मी पंडितजींचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा मी ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकात छोट्या सदाशिवची भूमिका करत असे. मी नमस्कार केल्यावर पंडितजींनी मला आशीर्वाद दिला. मला कौतुकाने मांडीवर बसवले आणि ‘दिन गेले भजनाविण सारे…’ या त्याच नाटकातील पदाच्या दोन ओळी गुणगुणल्या. मग चेष्टेने विचारले, काय, बरोबर आहे का?.आज त्यांनीच सुरू केलेल्या या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद वाटतो.”
सवाईचे दुसरे सादरीकरण तरूण सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांचे होते. संगीतकलेचा समृद्ध वारसा लाभलेले इंद्रायुध हे विख्यात सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे पुत्र आणि शिष्य. त्यांनीही ‘सवाई’ मधील पहिल्याच सादरीकरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “मी जेव्हापासून सरोद हे वाद्य वाजवू लागलो तेव्हापासून या स्वरमंचावर वाजवण्याची संधी मिळेल का, असा विचार मनात होता. आज तो दिवस आला, रसिकांची ही उपस्थिती आनंददायक आहे”, असे ते म्हणाले.
इंद्रायुध यांनी राग श्री मध्ये आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करत, रागाचे जणु स्वरचित्र रेखाटले. सरोदचा धीरगंभीर नाद मंडपात भरून राहिला. त्यांनी राग मांजखमाजमधील उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब यांच्या दोन रचना पेश केल्या. द्रुत लयीतील या वादनात तबलावादक ईशान घोष यांच्यासह सवाल जवाब विलक्षण रंगले. त्यांच्या वादनाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. दिगंबर जाधव यांनी तानपुऱ्यावर साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
