सहावी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ २०२५ टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ५ डिसेंबरपासून आयोजन !!
पुणे : लायन्स् क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ पुणे रहाटणी तर्फे कै. ला. सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ सहावी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ २०२५ टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हिंजेवाडी येथील फोरस्टार क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे अध्यक्ष महेश पांचाळ आणि कन्व्हेनर वसंतभाऊ कोकणे यांनी सांगितले की, पिंक बॉलवर साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ८ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ४० वर्षावरील प्रौढ गटातील दिडशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
रॉयल पासलकर, गार्गी एज्युकॉन, काटे वॉरीयर्स, आरआर वॉरीयर्स, लवास रॉयल्स्, स्वयम स्ट्रायकर्स, जेडब्ल्यु सुपरकिंग्ज् आणि टिळेकर ब्लॉस्टर्स या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. स्पर्धेत ८ संघांचे मिळून दोन गट तयार करण्यात आले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी लायन्स् क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हनर्र ला. राजेश अगरवाल, लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे अध्यक्ष महेश पांचाळ, श्रीमती अश्विनी सागर ढोमसे, ला. विशाल ढोमसे यांच्या हस्ते होणार आहे. पासलकर रॉयल्स आणि स्वयम स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, २८ डिसेंबर रोजी होणार आहे.
विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे समन्वयक ला. विजय कोतवाल यांनी स्पष्ट केले.
