तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी पुण्यात
पुणे : अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. यंदा देखील तर्पण फाउंडेशन तर्फे दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराच्या कमलनयन अतिथी गृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती तर्पण फाउंडेशनचे पुण्यातील संचालक संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अशोक गुंदेचा, जनार्दन चितोडे, राजेश मेहता, किशोर तळेकर, पुरुषोत्तम पाटील, शशिकांत जगदाळे, प्रविण पाटील, अनुप शहा आदी उपस्थित होते.
पुण्यातील विजय फळणीकर यांची ‘आपलं घरं’ संस्था, नाशिकमधील स्वामी नारायण मंदिराचे प.पू. माधव स्वामी महाराज आणि अमरावतीमधील गुंजन गोळे यांच्या ‘गोकुळाश्रम’ संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मानपत्र, रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित राहणार आहेत.
अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना देखील आमंत्रित करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत केले जात असे, मात्र यंदा हा सोहळा पुण्यात होणार आहे.
तर्पण फाउंडेशन हे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अनाथ मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते. आमदार श्रीकांत भारतीय यांनी तर्पण फाउंडेशनची स्थापना केली. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तर्पण फाउंडेशनचे संचालक आहेत. तर्पण फाउंडेशनचे महिला व बालविकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाले आहेत. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुले/मुलींचे डिग्री डिप्लोमा किंवा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊन त्यांच्या फी तसेच जेवण्या/राहण्याची व्यवस्था फाउंडेशन करते. फाउंडेशन मार्फत अनाथ मुलांच्या शिक्षणाबरोबरच नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. शिक्षण आणि नोकरी झाल्यानंतर मुलांचे विवाह जुळविणे आणि थाटात लग्न लावून देण्याचे कार्यसुद्धा फाउंडेशन करते. त्यामुळे अश्याप्रकारे अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहित करण्याकरीता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो.
