हिंदुजा परिवाराने संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये पाचव्यांदा सर्वात वरचे स्थान पटकावले
मुंबई : हिंदुजा परिवार आणि हिंदुजा ग्रुप या १०८ वर्षांची समृद्ध परंपरा पुढे चालवत असलेल्या, कित्येक बिलियन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे सह-अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांनी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये ३५ बिलियन पाउंडसह सर्वात वरचे स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये युनायटेड किंग्डममध्ये राहणाऱ्या टॉप १००० व्यक्ती किंवा परिवारांच्या निव्वळ संपत्ती रँकिंग्सचे संकलन करून त्यांच्यापैकी सर्वात श्रीमंत व्यक्ती किंवा परिवारांची नावे अधोरेखित केली जातात. हे प्रतिष्ठित रँकिंग हिंदुजा ग्रुपने उद्योगजगतामध्ये मिळवलेले लक्षणीय यश दर्शवते.
ऑटोमोटिव्ह, वित्त, ऊर्जा आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा परिवाराच्या योगदानामुळे त्या-त्या क्षेत्रांमधील मापदंड उंचावले आहेत इतकेच नव्हे तर, जागतिक अर्थव्यवस्थेवर त्यांनी स्वतःचा कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्री. एसपी हिंदुजा यांच्या दुःखद निधनानंतर अवघ्या काही तासांत संडे टाइम्स रिच लिस्ट प्रकाशित करण्यात आली. दिवंगत एसपी हिंदुजा आणि जीपी हिंदुजा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि धोरणात्मक मार्गदर्शनाखाली, हिंदुजा ग्रुपने विविध उद्योगांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे.
गोपीचंद हिंदुजा यांनी या उल्लेखनीय यशाविषयी सांगितले, “प्रतिष्ठित संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान मिळाल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. माझे माझ्या भावांवर अतिशय प्रेम आहे. आम्हा चौघांची शरीरे वेगवेगळी असली तरी आत्मा एक आहे. हा सन्मान आमच्या परिवाराची उत्कृष्टतेप्रती बांधिलकी दर्शवतो. आम्ही एकजुटीने करत असलेले प्रयत्न, आमची अखंड समर्पण वृत्ती आणि हिंदुजा परिवारातील प्रत्येक सदस्याच्या आणि आमच्या संघटनेतील अतुलनीय प्रतिभावंतांच्या उल्लेखनीय क्षमता यांचे हे फलित आहे.”
उद्योगव्यवसायांमध्ये बजावल्या जात असलेल्या दमदार कामगिरीबरोबरीनेच हिंदुजा परिवार हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या परोपकारी उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि समुदाय विकास यावर लक्ष केंद्रित करत हिंदुजा फाउंडेशनने असंख्य व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवून आणला आहे.
संडे टाइम्स रिच लिस्टमधील इतर धनवंतांमध्ये सर जिम रॅटक्लिफ – २९.६८८ बिलियन पाउंड, सर लिओनार्ड ब्लावातनिक – २८.६२५ बिलियन पाउंड, डेव्हिड व सायमन रेउबेन आणि परिवार – २४.३९९ बिलियन पाउंड, सर जेम्स डायसन आणि परिवार – २३ बिलियन पाउंड, लक्ष्मी मित्तल आणि परिवार – १६ बिलियन पाउंड आणि गाय, जॉर्ज, अॅलन आणि ग्लेन वेस्टन यांचा वेस्टन परिवार यांचा समावेश आहे.