देवकी पंडीत यांच्या सुमधुर गायनाने रंगला गंगाधर स्वरोत्सवाची सुरूवात
पुणे : पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सव २०२३’ या संगीत महोत्सवाचा आजचा पहिला दिवस विदुषी देवकी पंडीत यांच्या बहारदार गायनाने रंगला. अमोल निसळ यांच्यातर्फे त्यांचे गुरु पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी महोत्सवाचे हे ८ वे वर्ष असून सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्राच्या अॅम्फीथिएटर येथे महोत्सव संपन्न होत आहे.
महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी विदुषी देवकी पंडीत यांनी राग रागेश्रीने आपल्या गायनाला सुरुवात केली. आपल्या गुरू गानसरस्वती किशोरी अमोणकर यांनी रचलेली ‘आली री पलकन लागी मोरी जबसे शाम सिधारे…’ ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यानंतर गुरू पं जितेंद्र अभिषेकी यांनी रचलेली द्रुत तालातील ‘मोरा मन बस कर लिनो श्याम…’ ही बंदिश प्रस्तुत केली. यांनतर त्यांनी राग शंकरा मध्ये पं जितेंद्र अभिषेकी यांचीच पारंपरिक झपताल मधील ‘अनाहत अदा नाद भेद ना पायो…’ ही द्रुत बंदिश पेश केली. यांनतर ‘ए जियारा रे…’ ही मध्यलय रूपक तालातील पारंपरिक रचना सादर केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी ) सुस्मिरता डवालकर व कृपा नाईक (तानपुरा व स्वर) यांनी साथसंगत केली.
त्या आधी पं राजेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या सुमधुर बासरीवादनाने उपस्थितांची मने जिंकली. राग श्री ने त्यांनी आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित झपताल, द्रुत तीनताल, ततकारी व सवाल जवाब यांचे दमदार सादरीकरण केले. त्यांनी प्रस्तुत केलेल्या राग मिश्र काफी मधील ठुमरीने व कर्नाटकी शैलीतील रंजनी रागातील सादरीकरणाने उपस्थितांची वाह वाह मिळविली. द्रुत एकताला राग केदारच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. राग श्री आणि राग केदार बासरीवादक फार सादर करीत नाही मात्र मी आज उपस्थितांसाठी खास हे दोन्ही राग प्रस्तुत करतोय असे कुलकर्णी यांनी आवर्जून नमूद केले. मोहित पुराणकर (बासरी) व श्रीकांत भावे (तबला) यांनी साथसंगत केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा गद्रे यांनी केले.
