Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

मराठी भाषा विकासासाठी जागतिक पातळीवर एकत्र येण्याची गरज : डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे : मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. भारताबाहेर अनेक देशात वास्तव्यास असणार्‍या मराठी नागरिकांनी याबाबत त्यांच्या पातळीवर प्रयत्न देखील सुरू केले आहेत. कौटुंबिक पातळीपासून ते अगदी त्यांच्या परिसरातील शाळांमध्ये मराठी शिकविण्याचे प्रयत्न सुरू असणे ही खरच कौतुकास्पद बाब आहे. या पुढेही मराठीच्या आणि मराठी भाषिकांच्या विकासासाठी जागतिक पातळीवर काम करणारे नागरिक, संस्था यांनी एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले.

विश्व मराठी परिषदेच्या प्रा. क्षितिज पाटूकले यांच्या पुढाकाराने आज जगभरातील विविध देशांच्या मराठी नागरिकांसोबत दूरदर्शी प्रणालीद्वारे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या.

यावेळी अनेक नागरिकांनी त्यांच्या देशात सुरू असलेल्या मराठी भाषा विस्तार, संस्कृती संवर्धन, इतिहासबाबत जनजागृती, मराठी संस्कृतीची जतन करण्याची गरज याबाबत त्यांची मते मांडली. महाराष्ट्र शासन आणि मराठी नागरिकांकडून हव्या असलेल्या प्रतिसादाबाबत त्यांनी डॉ. नीलम गोर्‍हे यांना आपली मते सांगितली.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की या बाबत महाराष्ट्र शासनाकडून काय प्रयत्न होईल याबाबत तपासता येईल. याविषयी उत्साहाने काम आणि सहकार्य करणार्‍या अनेक संस्था आहेत. त्यांचीदेखील मदत आपल्याला घेता येईल. मराठी भाषा विषयक काम करण्यासाठी अनेक पातळ्यांवरून आपल्याला सहकार्य मिळू शकेल. याबाबत आपण लवकरच नियोजन करू या.

या बैठकीला अमेरिकास्थित विजय पाटील, सत्यजित गोर्‍हे – परळीकर, गजेंद्र सावंत, छायाताई पाटील, हेमा रांचमाले, विजय गई, औस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातून अभिजीत भिडे, स्वीडनमधून शैला धाबे, दुबईतून विशाखा पंडित, विद्या अधिकारी, जर्मनी मधून निनाद कुलकर्णी, प्रा. अनिकेत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading