Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

माजी सैनिक चाळिसाव्या वर्षी एमपीएससी उत्तीर्ण; सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुक

दौंड : भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी झालेल्या दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भेटून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा खास सत्कार केला.

अक्षय झुरुंगे असे त्यांचे नाव असून सध्या ते परिवहन खात्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्ष ज्योती झुरुंगे यांचे ते दीर आहेत. वयाच्या चाळीसाच्या वर्षी अभ्यास सुरू करणाऱ्या अक्षय झुरुंगे यांनी १७ वर्षे भारतीय लष्करात सेवा केली आहे. या कालावधीत त्यांनी देशाची सेवा करताना बर्फाने वेढलेल्या लेह, सियाचीन, सिलिगुडी आदी गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या प्रदेशात देशाची सेवा केली आहे. तेथून निवृत्त होताना सुभेदार ते पदावर होते.

निवृत्तीनंतर गावी आल्यावर त्यांनी शेती करण्यास प्रारंभ केला; मात्र त्यांच्यातील अभ्यासू विद्यार्थी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी अभ्यास सुरू केला. याशिवाय त्यांना शेतीही करायची होतीच. ती सुद्धा प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करायची होती. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत शेवग्याची शेती केली; आणि त्याचवेळी एकीकडे शेती करता करता त्यांनी जोमाने अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत ते यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. सध्या ते राज्याच्या परिवहन खात्यात अधिकारी असून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत.

दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या पाटेठाण येथे गेल्या असता त्यांनी आवर्जून झुरुंगे यांची भेट घेत त्यांचा खास सत्कार केला. लष्करी सेवेनंतर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी वयाच्या चाळिसाव्या वर्षी अभ्यास सुरू करून परीक्षा देणे, त्यात उत्तम गुणांनी पास होऊन शासकीय सेवा बजावताना जनसेवा करणे या झुरुंगे यांच्या आंतरिक उर्मीचे खासदार सुळे यांनी भरभरून कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही, तर नव्या पिढीने झुरुंगे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असेही त्या यावेळी म्हणाल्या. माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड शहराध्यक्ष गुरमुख नारंग, ज्योती झुरंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading