Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमीतर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेचे आयोजन

पुणे : एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने केवळ महिलांसाठी ज्येष्ठ एकपात्री कलाकार सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्यामल करंडक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दीपक रेगे, सचिव भाग्यश्री देशपांडे आणि कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निळू फुले कला अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख, एकपात्री कलाकार परिषदेच्या उपाध्यक्ष चैताली माजगावकर-भंडारी या वेळी उपस्थित होत्या. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी राज्यातून 40 स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी दि. 11 व 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असून अंतिम फेरी दि. 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्राथमिक फेरी निळू फुले कला अकादमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, काका हलवाई शेजारी, शास्त्री रोड, सदाशिव पेठ येथे होणार आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्या महिलेस पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व श्यामल करंडक देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व स्मृतीचिन्ह, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

असे आहेत स्पर्धेचे नियम..
स्पर्धा मराठी भाषेत होणार आहे. 18 वर्षावरील स्पर्धकास सहभागी होता येणार आहे. एकपात्री सादरीकरण म्हणजे नाटकातले स्वगत अथवा नाट्यछटा नव्हे. सादरीकरणासाठी लेखकाची परवानगी आवश्यक आहे. तसेच स्पर्धकाने किमान दोन अथवा दोन पेक्षा जास्त पात्रांच्या भूमिका सादर करणे अपेक्षित आहे. प्रत्येक स्पर्धकाला किमान 5 व जास्तीत जास्त 8 मिनिटे सादरीकरण करायचे असून अंतिम फेरीत दाखल होणाऱ्या स्पर्धकाला प्राथमिक फेरीतील सादरीकरणच करायचे आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सादरीकरणात कोणत्याही जातीचा, धर्माचा, राजकीय व्यक्तींचा उल्लेख नको, समाजात तेढ निर्माण होईल असे सादरीकरण नको. स्पर्धकांनी जाण्या-येण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. स्पर्धेची प्रवेश फी 300/- रुपये असून फी ऑनलाईन (गुगल पेसाठी क्रमांक – 9763594129) भरता येणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2023 असून स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी दिपाली निरगुडकर (9226130807) किंवा प्रिया उंडे (7498248342) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading