चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
मुंबई : टीव्ही कलाकार उर्फी जावेद हिच्या विचित्र पहरावावर राज्य महिला आयोग कारवाई का करत नाही? असे म्हणत महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यावर आता महिला आयोगाने चित्रा वाघ यांना महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बाजावली आहे. तसेच दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. चाकणकर म्हणाल्या, गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली आहे. महिला आयोगाने एका प्रकरणात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. मात्र आयोगाने तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. तर दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनिय, 1993 कलम 92 (2) (3) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवली असून खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असेही नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
