अशोकमामांचं काम हे ख-या अर्थाने ‘पर्व’च – चंद्रकांत पाटील
पुणे : आज व्यस्त राजकीय जीवनात रसिक म्हणून पूर्ण नाटकं पाहणं शक्य नसलं तरी मुंबईचा जन्म आणि लहानपण गेल्यामुळे मी अनेकदा शिवाजी मंदिरमध्ये अशोक मामांची नाटके समोर बसून पाहिली आहेत. अशोक सराफ यांची क्रेझ ही अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम असून अशोकमामांचं काम हे ख-या अर्थाने ‘पर्व’च आहे असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.
सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्यावर चित्रित लोकप्रिय गाणी, चित्रपट, नाटक, मुलाखत यांची मेजवानी असणा-या ‘अशोक पर्व’ या महोत्सवाचे उद्घाटन आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी अभिनेते अशोक सराफ यांबरोबरच कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या रावेतकर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर आणि अभिव्यक्ती संस्थेचे राजेश दामले आदी उपस्थित होते.
अशोक सराफ यांनी नुकतीच आपल्या वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली शिवाय मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या कारकीर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचेच औचित्य साधत अशोक सराफ यांचा जीवनप्रवास व त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास ‘अशोक पर्व’ हा विशेष कार्यक्रमात उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज नाटकाची तिसरी घंटा देत पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
तीन तास निवांत सांस्कृतिक कार्यक्रम एन्जॉय करणं हे माझ्यासाठी सध्या स्वप्नवत असून हाच ‘मेरे सपनों का भारत’ आहे असे मिश्कीलपणे म्हणत पाटील पुढे म्हणाले की, “आजही वयाची ७५ वर्षे पूर्ण केली तरी अशोक मामांच्या चेह-यावरील आणि अभिनयातील ताजेपणा टिकून आहे. ते मितभाषी असले तरी नाटकावेळी संवादावर त्यांची असलेली पकड प्रेक्षकांना खिळवून ठेवते.”
अमोल रावेतकर यांनी यावेळी उपस्थित प्रेक्षकांचे स्वागत केले आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अशोकपर्व सारख्या चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये सहभाग यापुढेही कायम असेल अशी ग्वाही देखील दिली.
यानंतर लगेचच अशोक सराफ व अभिनेत्री निर्मिती सावंत यांची भूमिका असलेला ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
‘अशोकपर्व’ या महोत्सवाअंतर्गत पुढील काही दिवसात ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपट दाखविण्यात येणार आहे. शिवाय ‘हृदयी वसंत फुलताना’ ही अशोक सराफ यांच्यावर चित्रित लोकप्रिय गाण्यांची मैफल देखील आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अभिनेते प्रशांत दामले हे अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतील. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. कार्यक्रमानंतर रसिकांच्यावतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येईल.
