PIFF 2023 : २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान
– महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी ५ जानेवारी तर स्पॉट नोंदणी १९ जानेवारी पासून सुरू
– पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे होणार महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन
– महोत्सवात दाखविण्यात येणारे सर्व चित्रपट हे ‘ए प्लस ग्रेड’चेच
पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावर्षी महोत्सवासाठी ७२ देशांमधून १५७४ इतके चित्रपट आले असून त्यापैकी १४० चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशन विश्वस्त सबिना संघवी, सतीश आळेकर, मोहन आगाशे आणि महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी महोत्सव हा केवळ चित्रपटगृहात अर्थात ऑफलाईन पद्धतीने होणार असून यावर्षीच्या महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवार दि. ५ जानेवारी रोजी http://www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया ही गुरुवार दि. १९ जानेवारी पासून सुरू होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) या तीन ठिकाणी एकूण ९ पडद्यांवर महोत्सवाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ जब्बार पटेल म्हणाले, “यावर्षी जानेवारी महिन्यात नियोजित असलेला महोत्सव आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देत फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे ठरविले आहे. आधीच्या तारखांदरम्यान जी २० परिषद संबंधी बैठका या पुण्यात होणार होत्या. या दरम्यान सेनापती बापट रस्त्यांवरील पॅव्हेलियन मॉलमध्ये महोत्सवाच्या ६ स्क्रीन्स होत्या. या ठिकाणी प्रशासनावरील ताण आणखी वाढू नये म्हणून आम्ही प्रशासनाच्या विनंतीचा स्वीकार करीत तारखा पुढे ढकलल्या.”
सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये ८०० इतके असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य व विद्यार्थी यांसाठी हे शुल्क रु. ६०० इतके आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
