भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप यांचे आज निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. गेले जवळपास तीन वर्षांपासून ते कर्करोगामुळे त्रस्त होते. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या ऐश्वर्या, बंधू असा मोठा परिवार आहे. आज दुपारी 3 ते 6 वा. पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. तर आज संध्याकाळी 7 वा. पिंपळे गुरव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आमदार जगताप हे गेली तीन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खलावत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे सक्रीय होते. ते महापालिकेचे चार वेळा नगरसेवक, महापाैर, तीन वेळा विधानसभेचे तर एकदा विधानपरिषदेचे आमदार राहिलेले. आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती.
अशी होती राजकीय कारकीर्द..
पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील कार्यक्षम, दमदार आमदार म्हणून लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे पाहिले गेले. १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून श्रीरंग बारणे यांचा पराभव केला. त्यांनंतर राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये चिंचवड विधानसभेतून आमदारकी मिळवली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. त्यांच्या निधनावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
