Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ ला पुणे विद्यापीठात प्रतिसाद

पुणे : तर्काधिष्ठित आणि परखड विचारांबरोबरच चिंतनशील झालेले अवघे जीवन आणि गहन अभ्यासातून तयार झालेल्या विचारांशी तत्वनिष्ठ राहून जगतानाच्या वेधक, भेदक आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या प्रसंगांनी तसेच साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोगाने ख्यातनाम विचारवंत (कै.) नरहर कुरुंदर यांची पुणेकर रसिक श्रोत्यांना भेट घडवली. ज्ञानवंताचे अलौकिक जगणे समोर आणणाऱ्या प्रसंगांनी रोमांच उभे करीत रसिकांना समृद्धही केले.

नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आयोजित ‘ नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ‘ हा नाटय प्रयोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृह येथे सोमवार,१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा प्रयोग झाला. तो निःशुल्क होता.ललित कला केंद्र,गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रयोग झाला.

प्रा.डॉ. सतीश आळेकर, दिलीप प्रभावळकर, समर नखाते , डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे होते. या नाटयप्रयोगात दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, शुभंकर देशपांडे, अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर यांचा सहभाग होता.मुंबई,औरंगाबाद, नांदेड, पुणे, नगर येथील यशस्वी प्रयोगानंतर हा प्रयोग पुणे विद्यापीठात झाला.

पुण्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आगळ्या- वेगळ्या नाट्य प्रयोगातून कुरुंदकर यांच्या जगण्यातील अनेक प्रसंग मोठ्या खुबीने मांडण्यात आलेच; शिवाय वक्ते म्हणून कुरुंदकरांची महाराष्ट्राला होत गेलेली ओळख, त्यांची विचार करण्याची तसेच विचार मांडण्याची व इतरांना पटवून देण्याची पद्धतही नाट्यप्रयोगातून अतिशय प्रभावीपणे उलगडत गेली.

कुरुंदकरांच्या धर्मचिकित्सेची विविध उदाहरणेही नाट्यप्रयोगातून समोर आली आणि त्यांचा परिणाम जवळजवळ सगळ्याच प्रसंगांमधून अधोरेखित झाला. सर्वच कलावंतांच्या उत्तम अभिनयाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचलनातून कुरुंदकर गुरुजींवर होत गेलेले भाष्यही मार्मिक ठरले .

मान्यवरांनी केले कौतुक
……………………….
प्रयोगानंतर यावेळी बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, ‘ या साभिनय नाटय प्रयोगाचे अनेक प्रयोग गावोगावी होवोत. त्यामुळे नव्याने कुरुंदकर कळतील. ‘

सतीश आळेकर म्हणाले, ‘कुरुंदकर यांचे लेख वाचत आम्ही मोठे झालो.परिशिलन, चिकित्सेची पध्दत, उदारमतवाद त्यांनी दिला. त्याचे दर्शन नाटय प्रयोगातून झाले.

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘ कुरुंदकर नावाच्या विश्वविद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे.कुरुंदकरांचे विचारविश्व मोठे होते, त्यातील न आलेले प्रसंग या प्रयोगात यावेत. प्रयोग चांगला आहे. ‘

नखाते म्हणाले, ‘वैचारिक लेखनाचा आणि वेगळया परिप्रेक्ष्याने भान देण्याचा प्रयत्न प्रयोगात झाला आहे. हे उत्तम सादरीकरण असले तरी समकालीन भारतीय संदर्भात पुनर्माडणी करता येणे शक्य आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्रा. अजित साबळे, प्रा. दीपक गरूड, प्रा. संदीप देशपांडे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading