‘हर हर महादेव’ चित्रपट वादात उतरले राज ठाकरे पुण्यात ‘या’ व्यक्तीची घेतली भेट
पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव चित्रपटामुळे राज्यात चांगलाच गदारोळ यला मिळतोय. या वादात राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना या चित्रपट गृहातील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडत प्रेक्षकांना मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडचाही या चित्रपटाला विरोध असून बऱ्याच चित्रपटगृहातील शो बंद पडले आहेत. तर दुसरेकडे मनसेने या चित्रपटाला समर्थन करत ठाण्यात मोफत शोचे आयोजन केले. यामुळे हर हर महादेव चित्रपटातून आता राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध मनसे असा नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. या वादात आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज पुण्यात इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांची भेट घेतली आहे.
राज ठाकरेंच्या भेटीबाबत इतिहास अभ्यासक मेहेंदळे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे आणि आमची भेट काही नवीन नाही, यापूर्वीही आम्ही भेटत होतो. बाबासाहेब पुरंदरे हयात असताना त्यांची भेट घेतल्यानंतर ते माझी भेट घ्यायचे. राज ठाकरेंना इतिहास आणि एकूण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासाबाबत एक कुतुहल आहे, त्यामुळे ते सातत्याने त्यांचे प्रश्न आमच्याकडून जाणून घेत असतात. आजही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल दहा प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून जाणून घेतली. अशी माहिती त्यांनी दिली.
