Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

जनुकविज्ञानाच्या अभ्यासातून भविष्यातील पिढ्या वाचवण्याचे काम – राज्यपाल

पुणे : जनुकविज्ञानाच्या (जेनेटिक सायन्स) माध्यमातून केवळ आजारांचे निदान करणे एवढेच नाही तर आजारांची कारणे आणि त्यावरील उपचार शोधणे आदी सर्व बाबी करुन भविष्यातील अनेकाअनेक पिढ्या वाचवण्याचे अत्यंत पवित्र काम केले जाते, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या (एमयुएचएस) पुणे विभागीय केंद्राने उभारलेल्या डॉ.घारपुरे स्मृती जेनेटिक प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्राचे (जीन हेल्थ) उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर (से. नि.), राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन ॲण्ड लॅबारेटरीचे चेअरमन सुहास जोशी, विद्यापीठाचे प्रति कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते.

सर्व नवीन ज्ञान हे अंतिमत: प्रयोगशाळेत निर्माण होते अशी आपली भावना असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, पूर्वी वैद्य प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा वापर करुन स्वत: निदान करायचे आणि स्वत:च औषधे बनवायचे. आता आधुनिक ॲलोपॅथी उपचार पद्धतीत औषध निर्माते, निदान प्रयोगशाळा, विशेषज्ञ डॉक्टर्स, औषधे, उपचार साधने यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा अशी एक साखळी आहे. परंतु, या साखळीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे म्हणजे येथे होत असलेले शोध, नाविन्य, संशोधन आहे. या आरोग्य विज्ञानातील प्रारंभिक बाबी आहेत. यानंतर डॉक्टर निदान आणि त्याआधारे उपचार करतात.

यावेळी कुलगुरु ले. जन. कानिटकर म्हणाल्या, दृष्टीकोन आणि त्यानुसारची कृती जग बदलू शकते. हे लक्षात घेऊन तसेच शिक्षण, सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि आरोग्यासाठी संशोधन या बाबी एकत्र कशा करता येईल हा दृष्टीकोन ठेऊन या ‘मॉलेक्युलर डायग्नोस्टिक इन जेनेटिक’ लॅबची उभारणी करण्यात आली आहे. हे करत असताना या केंद्राचे रुग्णाची काळजी हे मध्यवर्ती काम राहील. त्यासोबतच जेनेटिक्स विषयात क्षमता बांधणी व अभ्यासक्रम राबवणे आणि त्याचसोबत संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम येथे केले जाईल. ही प्रयोगशाळा राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांना या क्षेत्रातील निदानांसाठी उपलब्ध असेल असेही त्या म्हणाल्या. या क्षेत्रातील आजारांचे निदान अत्यंत खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत वाजवी दरात या प्रयोगशाळेमुळे तपासण्या होतील, असेही त्या म्हणाल्या.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading