P. N. Suratwala Cup – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी संघाला विजेतेपद !!
पुणे : क्रिक् चॅलेंजर्स आणि ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘पी. एन. सुरतवाला करंडक’ (कै. श्रीमती पुष्पाबेन नटवरलाल सुरतवाला) १५ वर्षाखालील मुलींच्या ५०-५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी संघाने ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी संघाचा ९३ धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
येवलेवाडी येथील ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात निकिता सिंग हिने फटकावलेल्या ७४ धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीने सामन्यात विजय मिळवून विजेतेपद मिळवले. व्हेरॉक अॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकात २८१ धावांचे आव्हान उभे केले. निकीता सिंग (७४ धावा), सुहानी कहनदाळे (५९ धावा), मेहेक मुल्ला (४९ धावा), मयुरी थोरात (३२ धावा) आणि परीणीता पाटील (२४ धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. मेहेक आणि सुहानी यांनी ९५ चेंडूत ८७ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी मयुरी आणि निकीता यांनी ७० चेंडूत ६१ धावांची भागिदारी करत २८१ धावा धावफलकावर लावल्या.
या आव्हानाला उत्तर देताना ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमीचा डाव ४१.३ षटकात १८८ धावांवर आटोपला. ज्ञानदा निकम (नाबाद ५४ धावा), भाविका अहीरे (४२ धावा) आणि ईश्वरी असावरे (२७ धावा) यांनी छोट्या धावा करत प्रतिकार केला. व्हेरॉक संघाच्या प्रणवी गाढवे (४-२८) आणि नाव्या दुबे (४-३३) यांनी अचूक गोलंदाजी करता संघाचा विजय सोपा केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर, नगरसेवक अप्पासाहेब रेणूसे, विजयशेठ गवारे, जयंत महाबोले, मयूर शहा, स्वप्निल शेलार, मनिष सुरतवाला, नंदकिशोर कुमावत आणि नितीन सामल यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी संघाला २१ हजार रूपये, मेडल्स् आणि करंडक तसेच, उपविजेत्या ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी संघाला ११ हजार रूपये, मेडल्स् आणि करंडक देण्यात आला. याशिवाय मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सुहानी खंड्याळ (२६३ धावा, ४ विकेट, व्हेरॉक अॅकॅडमी), सर्वोत्कृष्ट बॅटर ज्ञानदा निकम (२६५ धावा, ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी), गोलंदाज नाव्या दुबे (१७ विकेट, व्हेरॉक अॅकॅडमी), उदयोन्मुख खेळाडू ईश्वरी अवसरे (२३९ धावा, ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमी) अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीः ५० षटकात ६ गडी बाद २८१ धावा (निकीता सिंग ७४ (७१, ११ चौकार), सुहानी कहनदाळे ५९ (७३, ९ चौकार), मेहेक मुल्ला ४९ (५१, ७ चौकार), मयुरी थोरात ३२, परीणीता पाटील २४, ज्ञानदा निकम २-४४); (भागिदारी- पहिल्या गड्यासाठी मेहेक आणि सुहानी ८७ (९५); चौथ्या गड्यासाठी मयुरी आणि निकीता यांच्यात ६१ (७०) वि.वि. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अॅकॅडमीः ४१.३ षटकात १० गडी बाद १८८ धावा (ज्ञानदा निकम नाबाद ५४ (७९, ६ चौकार, १ षटकार), भाविका अहीरे ४२, ईश्वरी असावरे २७, प्रणवी गाढवे ४-२८, नाव्या दुबे ४-३३); सर्वोत्कृष्ट खेळाडूः निकिता सिंग;
