गुजरात जायंट्सचा बेंगळुरू बुल्स संघावर विजय
प्रतिकचा १६ गुणांचा तर राकेशचा १० गुणांचा विजयात वाटा
पुणे : राकेश आणि प्रतिक दहिया यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात बंगळुरू बुल्स संघाचा ४६-४४ असा निसटता पराभव करताना अदानी स्पोर्ट्सलाईन यांच्या मालकीच्या गुजरात जायंट्स संघाने विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या नवव्या मौसमात पाचव्या विजयाची नोंद केली. प्रतिक याने या विजयात १६ गुणांचा तर राकेशने १० गुणांचा वाटा उचलला
राकेशने अगदी सुरुवातीपासूनच अप्रतिम चढाया करताना पूर्वार्धात आठ गुणांची कमाई करून गुजरातला मध्य तरापर्यंत ५ गुणांची आघाडी मिळवून दिली. राकेश च्या सुपर टेन गुणांमुळे गुजरात संघाने ही आघाडी कायम राखत रोमांचकारी विजयाची नोंद केली.
राकेश याने या विजयात बहुमोल वाटा उचलला तर, नुकताच फॉर्म गवसलेल्या प्रतिकने त्याला चांगली साथ दिली. त्यांच्या कामगिरीमुळे पूर्वार्धातच बेंगळुरू संघावर लोण चढवताना गुजरातने मिळवलेली आघाडी निर्णायक ठरली. उत्तरार्धातही सामना चुरशीच्या स्थितीत असताना प्रतिकने अखेरच्या काही मिनिटांत एका चढाईत ४ गुण टिपून सामना गुजरातच्या बाजूने झुकवला. गुजरातच्या ४६ गुणांमध्ये प्रतिकच्या १६ गुणांचा मोलाचा वाटा होता.
गुजरातचे बचावपटू रिंकू आणि मनोज याना सूर गवसण्यास वेळ लागला. परंतु एकदा लय गवसताच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विशेषतः अखेरच्या १० मिनिटात रिंकुने चार तर मनोजने तीन गुण मिळवुन गुजरातचे वर्चस्व कायम राखले. अक्रम शेखनेहि काही अप्रतिम पकडी करताना गुजरातच्या बचावात आपला वाटा उचलला.
