पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात तुळशीविवाह सोहळा थाटात
पुणे : मंगलाष्टकांचे सूर, राधे-कृष्ण गोपाल कृष्ण चा जयघोष आणि श्रीकृष्ण-तुळशीवर झालेला अक्षदांचा वर्षाव अशा वातावरणात पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिराच्या सभामंडपात तुळशीविवाह सोहळा थाटात संपन्न झाला. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर विवाह सोहळ्याचा विधी उत्साहात पार पडला. यावेळी पुणेकरांनी पारंपरिक वेशात मोठया संख्येने हजेरी लावली.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने पेश्वकालीन तुळशीबाग राम मंदिरात तुळशीविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
सनईचे मंगल सूर निनादत असताना उपस्थित महिलांनी मंगलाष्टके म्हणत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. आकाशकंदील, फुलांच्या माळा आणि विविधरंगी लाईटस्नी मंदिराचा प्रांगण सजविण्यात आला होता. विवाह सोहळ्याला पारंपरिक वेशात लहान मुला- मुलींनी देखील हजेरी लावली. विवाह सोहळ्यानंतर चिमुकल्यांनी श्रीकृष्ण – तुळशीला औक्षण केले. तुळशीविवाह सोहळ्याला मोठया संख्येने पुणेकर उपस्थित होते.
- सोमवारी (दि.७) वैकुंठ चतुर्दशीला श्रीरामाचे मुक्त दर्शन घेण्याची संधी
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीचे मुक्त दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. सोमवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १ यावेळेत भाविकांना थेट गाभा-यात जाऊन श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीचे दर्शन घेता येईल. तरी भाविकांनी मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
