ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अवमानकारक भाषा वापरुन सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळमध्ये भाषण करताना जाधव यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्यानंतर कुडाळ आणि अन्य ठिकाणीही भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिसांमध्ये योगेश अरुण शिंदे यांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन जाधव यांच्याविरोधात कलम 500, 501, आणि 502 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.