‘जितो’च्या महिला विभागाच्या अध्यक्षपदी पुण्यातील संगीता ललवानी यांची नियुक्ती
पुणे : पुण्यातील उद्योजिका संगीता ललवानी यांची जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना (जितो) च्या ‘लेडीज विंग’ अर्थात महिला विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कायदा अभ्यासक्रमात पदवी प्राप्त केलेल्या ललवानी या एक उत्तम स्कूबा ड्रायव्हर, उत्साही ट्रेकर, मॅरेथॉन धावपटू आहे. एक यशस्वी उद्योजक असण्याबरोबरच त्यांनी विविध सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्या रुणवाल प्रतिष्ठान’च्या विश्वस्त आहेत.त्याचबरोबर जितो, फिक्की फ्लो आणि रोटरी आदी संघटनांची वरिष्ठ पदे त्यांनी भूषविली आहेत. गोल्ड मार्ट ज्वेलर्स, पुणे च्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जवाबदारी देखील त्या सांभाळतात.
आपल्या या नियुक्तीबाबत ललवानी म्हणाल्या, “ एक अध्यक्ष म्हणून माझे प्राथमिक भर हा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, जैन महिलांबाबतचे ज्ञान आणि जैन संतांची सेवा यावर असेल. जितो’च्या लेडीज विंगमध्ये आम्ही महिलांसाठी नोकरी व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, कला आणि संस्कृती संदर्भातील उपक्रम, व्यवसायविषयक प्रश्नांची उत्तरे आणि महिलांना त्यांची खरी क्षमता शोधण्यात मदत करू.’’
जितो ही एक जागतिक संघटना असून, व्यावसायिक, उद्योगपती, तज्ज्ञ आणि कामगार यांचा यामध्ये सामावेश आहे. ही संघटना नैतिक व्यवसाय पद्धतींचे वैभव प्रतिबिंबित करते. भारतात या संघटनेची स्थापना २००७ साली झाली. संघटनेचे भारतात एकूण १० प्रशासकीय क्षेत्र आणि एकूण ६५ विभाग आणि 35 शाखा आहेत. यूएसए, यूके, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, दुबई आणि हाँगकाँगमध्ये अशा विविध देशांत संघटनेने आपला विस्तार केला आहे. प्रामुख्याने जैन बांधवांचे सामाजिक-आर्थिक सबलीकरण करणे, मूल्य आधारित शिक्षण उपलब्ध करून देणे, जैन समुदाय कल्याण, करुणाभाव आणि जागतिक मैत्रीचा प्रसार आणि आध्यात्मिक उन्नती हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जितो लेडीज विंग ही संघटना जैन समाजातील महिलांच्या विकासासाठी कार्य करते. महिलांचे नोकरी, शिक्षणविषयक प्रश्न सोडविणे कला आणि संस्कृती, उद्योग यांच्याशी निगडीत समस्या असोत, किंवा महिलांना त्यांच्यामधील क्षमता शोधण्यास, त्यांचे ध्येय ओळखण्यास या संस्थेच्या माध्यामातून सहकार्य केले जाते.
