शिवप्रताप दिनाच्या देखाव्याला धार्मिक रंग न देता संपूर्ण सत्य अधोरेखित करण्याची गरज -अझहर तांबोळी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवात अफझलखान हत्येचा जिवंत देखावा दाखवण्यासाठी सुरुवातीला पोलिसांकडून परवानगी नाकारणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सत्य ऐतिहासिक घटनांवर देखावे दाखवण्यासाठी प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता लागता कामा नये.
शिवप्रताप दिनाचा जिवंत देखावा नाकारणारे पोलीस खाते ( गृह खाते ) भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सुरुवातीला परवानगी नाकारून नंतर परवानगी देऊन फुशारकी मारण्यात काही अर्थ नाही. भाजपा नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जातीय-धार्मिक राजकारण करत आली आहे . दि. १ नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून , त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी या गद्दाराची हत्या करून सांस्कृतिक दहशतवाद संपवला होता.
या शिवप्रताप दिनाचे ऐतिहासिक सत्य पाहता धार्मिक भूमिकेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे कोणाच्या धार्मिक अथवा इतर भावना दुखण्याचे प्रश्नच उद्भवू शकत नाही. परंतु ज्या मानसिकतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, त्यांना क्षत्रिय मानण्यास नकार देणाऱ्या आणि मिर्झा राजा जयसिंगच्या विजयासाठी यज्ञ करणारी मानसिकता आज हिंदुत्वाच्या नावावर राजकीय पोळी भाजू पाहत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. महाराजांनी धर्माचं राजकारण केले नाही तर धर्माने राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे राजे होते कोणा एका धर्माचे अथवा जमातीचे राजे नव्हते. याबाबत शिव चरित्र व कित्येक ऐतिहासिक घटना पुराव्यादाखल साक्षीदार आहेत.
अर्धसत्य हे असत्या पेक्षा ही जास्त धोकादायक असते. सांगलीत घडलेली दंगल व सध्या राजकीय स्वार्थापोटी चाललेले धार्मिक ध्रुवीकरणच्या राजकरणाची पार्श्वभूमी समोर ठेवत आम्ही पुणे पोलिसांना आवाहन करतो की, अर्ध सत्य दाखवून गणेश उत्सवाचे पावित्र्य भंग करत समाजात धार्मिक तेढ निर्माण करून आपले राजकीय स्वार्थ साध्य करण्याचा कोणी प्रयत्न करीत असल्यास राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा सर्वोतपरी ठेवत पुणे व महाराष्ट्रातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई करावी. अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे महासचिव अजहर तांबोळी यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी चे राज्य सचिव ताज सिद्दीकी, दिलावर सय्यद, सलीम शेख, राजा फैयाज उपस्थित होते.
