Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

डॉ. नीलकंठ ढेरे सृजनशील संशोधक : डॉ. सुभाष घैसास

पुणे : जगाला नाविन्यपूर्ण करून दाखविण्याची कर्तबगारी असलेले डॉ. नीलकंठ ढेरे हे जागतिक कीर्तीचे सृजनशील संशोधक होते. भारतातून परदेशात विशेषत: अमेरिकेमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सर्वतोपरी सहकार्य तर केलेच त्याच बरोबर त्यांचे पालकत्वही स्वीकारले, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रख्यात प्राध्यापक डॉ. सुभाष घैसास यांनी केले.
सौरशक्तीचा वेध घेणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वैज्ञानिक डॉ. नीलकंठ ढेरे यांच्याविषयी त्यांच्या आप्तजन, सहकारी व मित्र परिवाराने व्यक्त केलेल्या आठवणी ‘ए ट्रिब्युट टू अवर ओन सौरोर्जा’ या पुस्तकाद्वारे संकलित करण्यात आल्या आहेत. डॉ. ढेरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन त्रिदल सभागृह, कोथरूड येथे डॉ. घैसास यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ वास्तुविशारद संजीव पवार, डॉ. स्नेहलता तावरे, डॉ. रमेश ढेरे, डॉ. अशोक ढेरे व्यासपीठावर होते.
डॉ. घैसास म्हणाले, डॉ. ढेरे हे अतिशय प्रज्ञावंत होते. त्यांनी देश-विदेशात अनेक संशोधनपर निबंध सादर केले. त्यांचे औदार्य कल्पनातीत होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. आपल्या शिक्षणाचा, पदाचा त्यांना अजिबात गर्व नव्हता तर उलट प्रत्येक वयोगटातील व्यक्तीशी ते मैत्रत्वाने वागत. डॉ. ढेरे यांनी सौरशक्ती तंत्रज्ञानविषयक सखोल संशोधन करून व तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करून फ्लोरिडा येथे 1990 साली जागतिक पातळीची संशोधनपर प्रयोगशाळा उभी केली. या कार्यासाठी त्यांना अमेरिककडून अनेकदा गौरविले गेले. 

डॉ. अशोक ढेरे, डॉ. मकरंद खरे, अनिता पवार, हिरालाल बलदोटा, डॉ, स्नेहसुधा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात पल्लवी चिटगोपकर यांनी भगवद्‌‍ गीतेतील कर्मयोग सांगणारा तिसरा अध्याय सादर करून केली तर सूत्रसंचालन डॉ. अशोक ढेरे यांनी केले. डॉ. ढेरे यांचे बंधू डॉ. रमेश ढेरे, डॉ. अशोक ढेरे, भगिनी डॉ. स्नेहलता तावरे, डॉ. रजनी बेन्नूर यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading