अल्टिमेट खो खो स्पर्धेत राजस्थान वॉरियर्स ला पराभुत करून ओडिशा जगरनट्स प्रथमच अग्रस्थानी
पुणे : पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनट्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाला 6गुणांच्या फरकाने पराभुत करून प्रथमच गुण तालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. ओडिशा ससंघाने हा सामना 51-45 असा जिंकताना या मौसमातील पाचव्या विजयाची नोंद केली. त्याउलट राजस्थानचा हा सलग सहावा पराभव ठरला. ओडिशा संघाचे आता 15 गुण झाले असून त्यांनी तेलगु योद्धाज(12गुण) संघाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलून पाहिले स्थान मिळवले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यात निलेश जाधवने सहा बळींसह एकूण 16 गुणांची कमाई करताना ओडिशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एमके गौतमने सहा गुण मिळवताना त्याला चांगली साथ दिली. राजस्थानकडून वझीर ऋषिकेश मुरतावडे याने सात गुण मिळवताना दिलेली झुंज एकाकी ठरली.
त्याआधी ओडिशाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. राजस्थानने पावर प्लेचा वापर करताना ओडिशाची पहिली तुकडी 1मिनिटे 32 सेकंदात गार केली. परंतु दुसऱ्या तुकडीतील निलेश जाधव आणि एम के गौतम यांनी अनुक्रमे 3मिनिटे 2 सेकंद आणि 3मिनिटे 32 सेकंद संरक्षण करताना ओडिशाला 4 बोनस गुण मिळवून दिले. तिसऱ्या तुकडीतील सूरज लांडे नाबाद राहिला.पहिल्या सात मिनिटाअखेर राजस्थान 21-04 असा आघाडीवर राहिला.
दुसऱ्या सत्रात ओडिशाने पावर प्ले घेऊनही अक्षय गणपुळे(2मिनिटे 35 सेकंद), ऋषिकेश मुरतावडे व दिलराज सिंग सेंगर (3मिनिटे 25 सेकंद) यांच्या मुळे राजस्थानला बोनस गुण मिळाले. निलेश जाधव ने मोहम्मद तासीनला बाद केले परंतु बाकी दोन्ही खेळाडू नाबाद राहिल्याने पहिल्या डावा अखेर राजस्थानकडे 27-21 अशी आघाडी राहिली.
तिसऱ्या सत्रात राजस्थानने ओडिशाची पहिली तुकडी 1मिनिटे 55 सेकंदात बाद करून आपली आघाडी 35-21 अशी वाढवली. दुसऱ्या तुकडीच्या वेळी राजस्थानच्या फाउल मुळे दिपेश मोरे(3मि 58 सेकंद) आणि दिलीप खांडवी यांनी ओडिशाला बहुमोल बोनस गुण मिळवून दिले तरीही तिसऱ्या सत्रा अखेर राजस्थान 43-27 असा आघाडीवर होता.
चौथ्या सत्रात ओडिशाला विजयासाठी 17 गुणांची गरज होती. भरत स्वयंचित झाला तर, गौतमने धनंजय सिंगला तर महेश ने भुवनेश्वर साहूला स्काय डाईव्हच्या साहाय्याने बाद करून ओडिशाची पिछाडी 36-43 अशी कमी केली.याचवेळी ओडिशाने पावर प्लेचा वापर केला. अत्यंत मोक्याच्या क्षणी निलेश ने सतीशला बाद केले तर, गौतमने अप्रतिम सूर मारत अभिजीत पाटीलला तंबूत परतवून गुणफलक 42-23 पर्यंत नेला.
यावेळी अक्षय गणपुळेने अखेरच्या क्षणी राजस्थानला बोनस गुण मिळवुन दिले. परंतु तो बाद झाल्याने सामना 45-45 असा बरोबरीत गेला. तिसऱ्या तुकडीकडे 1मिनिटे 55 सेकंद वेळ शिल्लक होता. त्यामुळे बोनस गुण मिळू शकत नव्हता. याचवेळी दिनेश नाईकने सुरेश सावंत ला बाद करून ओडिशाला 48-45 असे आघाडीवर नेलं. ऋषिकेश नाबाद राहिला परंतु ओडिशाने अखेरच्या क्षणी राजस्थानच्या दिलराजला बाद करून 51-45 अशा विजयाची निश्चिती केली.
