जुनैद मोहम्मदच्या साथीदारांचा कट महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने उधळला
नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण होते ‘टारगेट’
पुणे : दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जुनैद मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांचा कट महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने आज उघडकीला आणला आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ले करणार होते. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तीन व्यक्तींवर हल्ल्याच्या तयारीत होते. इतकेच नव्हे तर उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या रॅलीवर देखील हल्ला करायचा प्लॅन बनवला होता. जुनेद मोहम्मद याला पुण्यातील दापोडी भागातून ताब्यात घेण्यात आले होते.
माहितीनुसार, स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात बसलेल्या एका मास्टरमाईडकडून येणार होते. जो प्लॅन आखला जाणार त्यासाठी जुनेद मोहम्मद निघण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. जुनेद मोहम्मद सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने आत्तापर्यंत सतराहून अधिक फेसबुक अकाउंट तयार केले होते आणि त्याद्वारे तो इतरांशी संवाद साधायचा.
जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे या आधी झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
